कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई, दि.१९ : अजय मगरे
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये गेले २८ दिवसांपासून बौद्ध भिक्खू विद्यार्थ्याचे आंदोलन सुरु आहे. विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकाने विद्यार्थ्यावर हल्ला करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याचे पडसाद आज कलिना कॅम्पसमध्ये उमटले.
विद्यार्थ्यावरील हल्ला आणि गुन्हा दाखल केल्याप्रकरणी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आज आंदोलकांनी केली.
मुंबई विद्यापीठातील पाली विभागाला तातडीने अनुदानित दर्जा द्यावा आणि स्वतंत्र इमारत उपलब्ध करून द्यावी. गेल्या २८ दिवसांपासून संशोधक भदंत विमांसा याचे गेल्या २८ दिवसांपासून कलिना कॅम्पसमध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु आहे.
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू कलिना विद्यापीठात आले असताना विमांसा यांनी त्यांची भेट मागितली. त्यांना भेट नाकारून विद्यापीठ प्रशासनाने बौद्ध भिखू यांना मारहाण करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी विद्यापीठात शेकडो समर्थकांनी आंदोलन केले.
सुरक्षा अधिकाऱ्याला विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचे आदेश कुलगुरूंनी दिले आहेत. त्यामुळे कुलगुरूंनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्र्यांना भेटण्यासाठी परवानगी असतानादेखील विद्यार्थीची भेट घेण्यात विद्यापीठ प्रशासनाने अडथळा आणला.
हे करताना त्यांनी सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम व युजीसीच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केलेले दिसते. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे, संबंधित विद्यार्थी जे बौद्ध भिक्खू आहेत, त्यांच्यावर प्रशासनाने हल्ला केला, खोटी कथा पसरवत खोटा गुन्हा नोंदवला.विद्यापीठ प्रशासनाचा हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्याचे मनसेच्या विद्यार्थी सेनेचे राज्य सरचिटणीस अॅड. संतोष गांगुर्डे यांनी सांगितले.




















