कोपरगाव, दि.७ : चंद्रकांत जोर्वेकर
श्रावण महिन्यातील पवित्र नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात चांगलाच उत्साह पाहायला मिळत आहे. येत्या ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये विविध प्रकारच्या राख्यांची दुकाने सजली असून, खरेदीसाठी बहीण- भावंडांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्याचा प्रेमळ सण मानला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. भावंडे एकमेकांना भेटवस्तू देत सण साजरा करतात. या दिवशी गोडधोड जेवण, विशेषतः पुरणपोळीचा आस्वाद घेत पारंपरिक पद्धतीने आनंद साजरा होतो.
शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर आणि विविध चौकांमध्ये राखी विक्रीसाठी स्टॉल्स उभारण्यात आले असून, रंगीबेरंगी व आधुनिक डिझाइनच्या राख्यांना विशेष मागणी आहे. मुलींसोबत महिला आणि लहान मुली विविध प्रकारच्या आकर्षक राख्या खरेदी करताना दिसून येत आहेत.
सणाच्या पार्श्वभूमीवर कोपरगावचा बाजार सध्या फुलला असून, व्यापाऱ्यांनी राख्या, भेटवस्तू आणि गोडधोड पदार्थांचे स्टाॅल्स लावून सजावट केली आहे. तीन दिवस साजऱ्या होणाऱ्या या सणामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.




















