ठाणे : दि.३० (अजय मगरे )
ठाण्यातील अंबिका नगरात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त “एक गाव, एक जयंती” उपक्रमांतर्गत अंबिका नगर येथे भव्य शाहीर जलसा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवभिम शाहीर जलसा प्रमुख शाहीर राजेंद्र कांबळे यांनी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रम समितीचे पदाधिकारी, विविध संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या ओजस्वी आणि प्रेरणादायी जलशाने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात संविधानिक मूल्यांचे स्मरण करून देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि समितीने विशेष परिश्रम घेतले.





















