कोपरगाव, दि.३ : दिलीप गायकवाड
मराठा साम्राज्याचे धुरीण, बाजीराव–काशीबाईंचे सुपुत्र आणि इतिहासातील प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रघुनाथराव पेशव्यांच्या (१७३४–१७८३) समाधीस्थळाकडे प्रशासनाने कायमच डोळेझाक केल्याचे चित्र समोर आले आहे. कोपरगावपासून काही किलोमीटर अंतरावर गोदावरीकाठच्या हिंगणी गावातील हा ऐतिहासिक वारसा आज पूर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत आहे.

रघुनाथरावांचे निधन कोपरगाव येथे झाल्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार गोदावरी तीरावर करण्यात आले आणि पुढे त्याच ठिकाणी समाधी उभारण्यात आली. मात्र आज या परिसरातील तटबंदी अपूर्ण, भगदाडे, झुडपे, तडे गेलेल्या रचना आणि माहितीफलकांचा पूर्ण अभाव अशी अत्यंत दयनीय परिस्थिती पाहायला मिळते. इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत रोष निर्माण झाला आहे.

हिंगणी येथील ज्येष्ठ नागरिक गोविंदराव पवार यांनी अलीकडील पाहणीवेळी बहुजन शक्ती न्यूजशी बोलताना, “इतकं महत्त्वाचं ऐतिहासिक ठिकाण असूनही कोणतेही संवर्धन झालेलं नाही. इतिहास जपण्याच्या घोषणा फक्त कागदावरच राहतात,” अशी तीव्र खंत व्यक्त केली.
या पाहणी मोहिमेत संतोष दळवी, सुनील जाधव तसेच बहुजन शक्ती न्यूजचे कार्यकारी संपादक दिलीप गायकवाड उपस्थित होते. त्यांनीही समाधीची दुरवस्था पाहून तत्काळ संवर्धनाची मागणी केली असून प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, ११ डिसेंबरला रघुनाथराव पेशव्यांची पुण्यतिथी असून या पार्श्वभूमीवर समाधीस्थळाच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हिंगणीतील आणखी एक गंभीर प्रश्न — अरुंद पूल धोकादायक
हिंगणी बंधाऱ्याजवळील राघोबा राजांच्या वाड्याकडे जाणारा पूल अत्यंत अरुंद असून रक्षक कठाटेही नाहीत. त्यामुळे या मार्गावरून जाणे-येणे अत्यंत धोकादायक बनले आहे. सतत अपघात घडत असल्याने स्थानिक व तालुक्यातील नागरिकांनी या ठिकाणी नवीन भक्कम व रुंद पुलाच्या उभारणीची मागणी केली आहे.




















