मुंबई | मंगेश म्हात्रे
सायन-कोळीवाडा परिसरातील राजकारणात नव्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे शहर पातळीवरील पदाधिकारी ऑल्वीन दास यांनी उपसभापती सचिन अहिर यांची महिनाभरात दुसऱ्यांदा भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या भेटीनंतर ऑल्वीन दास यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
विशेष म्हणजे, खासदार संजय दिना पाटील आणि सचिन अहिर यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर ऑल्वीन दास यांच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही भेट केवळ शिष्टाचारापुरती होती की भविष्यातील राजकीय निर्णयाचे संकेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोण आहेत ऑल्वीन दास?
ऑल्वीन दास यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून केली. त्यांच्यावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या दक्षिण-मध्य मुंबई जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर दक्षिण-मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्या काळात केंद्र आणि राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असल्याने या पदाला मोठे राजकीय महत्त्व होते.
ऑक्टोबर २०१४ मध्ये ऑल्वीन दास यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर २०१९ मध्ये सचिन अहिर आणि संजय दिना पाटील यांनी संयुक्त शिवसेनेत प्रवेश केला. आता हे दोन्ही नेते शिवसेना (शिंदे गट) मध्ये सक्रिय झाल्यानंतर ऑल्वीन दास यांच्या पुढील भूमिकेबाबत पुन्हा चर्चांना वेग आला आहे.
भाजपमध्ये कोंडी, शिंदे गटात संधी?
सायन-कोळीवाडा मतदारसंघात वरवर एकसंघ वाटणारी भाजप भाजपचे गटातटात विभगाली गेली आहे. स्थानिक स्तरावर ऑल्वीन दास यांची राजकीय कोंडी झाल्याचेही बोलले जाते. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, भाजपमध्ये ऑल्वीन दास हे विनोद तावडे यांच्या गटाशी संबंधित मानले जातात.
दरम्यान, ऑल्वीन दास राहत असलेल्या प्रभाग क्रमांक १७३ मध्ये शिवसेना (शिंदे गट) कडे मजबूत स्थानिक नेतृत्वाची कमतरता असल्याचे सांगितले जाते. मंगेश सातमकर यांच्या प्रभाग बदलानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी अजूनही कायम असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत ऑल्वीन दास यांच्याकडे प्रभावी स्थानिक नेतृत्व म्हणून पाहिले जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. संघटनात्मक ताकद आणि स्थानिक संपर्काच्या जोरावर ऑल्वीन दास महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, अशीही चर्चा रंगली आहे.
महिनाभरात झालेल्या दुसऱ्या भेटीनंतर ऑल्वीन दास भाजपमध्येच राहणार की नवीन राजकीय निर्णय घेणार, याकडे आता दक्षिण-मध्य मुंबईतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, त्यांच्या पुढील भूमिकेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.




















