कल्याण फाटा परिसरात सापळा रचून कारवाई; ऑटो रिक्षा, मोबाईल व रोख रकमेसह ३.०५ कोटींचा मुद्देमाल जप्त
ठाणे,दि.२८.( प्रतिनिधी )
ठाणे गुन्हे शाखेच्या घटक-१ पथकाने अंमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेत मोठी कारवाई करत ३ कोटी ४ लाख रुपये किमतीचा १ किलो ५२० ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी सलमान मुन्ना शेख (वय ३०, रा. मुंब्रा) याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २६ जुलै रोजी रात्री कल्याण फाटा येथील क्विन्स केअर हॉस्पिटलसमोर सापळा रचण्यात आला. आरोपी ऑटो रिक्षातून एमडी विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून व्यापारी प्रमाणातील एमडी पावडर जप्त करण्यात आली.
या कारवाईत अंमली पदार्थासह वाहतुकीसाठी वापरलेली ऑटो रिक्षा, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ३ कोटी ५ लाख २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिळडायघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयाने ३१ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीकडे एमडी कोणी पुरवला आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

















