मुंबई : अजय मगरे
एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. बसस्थानकांवर स्वच्छता राखण्यात कसूर झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी बजावले.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित स्वच्छता आढावा बैठकीत सरनाईक बोलत होते. बैठकीला महामंडळाचे विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक उपस्थित होते.
दोन रुपये स्वच्छता अधिभार, मग सुविधा कुठे?
एसटी महामंडळ प्रवाशांकडून दोन रुपये स्वच्छता अधिभार आकारते. मात्र, या शुल्काच्या बदल्यात प्रवाशांना स्वच्छ आणि आरोग्यदायी सुविधा मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नसून, प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कंत्राटदारांवरच जबाबदारी ढकलू नका!
बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची नियमित तपासणी करावी, स्वच्छतेच्या कामावर सातत्याने देखरेख ठेवावी आणि कंत्राटदारांकडून करारातील अटींनुसार काम करून घ्यावे, असे आदेश सरनाईक यांनी दिले. स्वच्छतेची जबाबदारी केवळ कंत्राटदारांवर सोपवून प्रशासनाला हात झटकता येणार नाही. आपल्या कार्यक्षेत्रातील बसस्थानकांवर प्रत्यक्षात स्वच्छता राखली जाते की नाही, याची खातरजमा संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः करावी, असेही त्यांनी बजावले.
एसटी ही सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे सुरक्षित आणि सुखकर प्रवासासोबतच स्वच्छ बसस्थानके, स्वच्छ प्रसाधनगृहे आणि आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देण्यास महामंडळाने प्राधान्य द्यावे. प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही सरनाईक यांनी केले.




















