उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककलेच्या क्षेत्रातील एक दिमाखदार पर्व संपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मधू कांबीकर यांनी आपल्या समर्थ अभिनयाने, वैशिष्ट्यपूर्ण नृत्यशैलीने आणि बहारदार लावणीच्या सादरीकरणाने अनेक दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या लोककलेचा अस्सल बाज त्यांनी आयुष्यभर जपला. लोककलेच्या व्यासपीठावरून सुरू झालेला त्यांचा प्रवास मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचला.
मधू कांबीकर यांनी बालवयातच रंगभूमीवर पदार्पण केले. लावणी आणि तमाशासारख्या पारंपरिक लोककलांना प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी ७५ हून अधिक चित्रपटांसह अनेक नाटकांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवली.
ग्रामीण महाराष्ट्रातील लोककलेपासून चित्रपटसृष्टीपर्यंतचा त्यांचा प्रवास जिद्द, संघर्ष आणि कलेवरील निष्ठेचा प्रेरणादायी आदर्श आहे. त्यांच्या निधनाने मराठी कलाक्षेत्रातील प्रतिभावान आणि अस्सल कलावंत हरपला असून, त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि लोककलेतील योगदान रसिकांच्या स्मरणात कायम राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मधू कांबीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

















