ठाणे : प्रतिनिधी
प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना यंदाचा ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठवाडा जनविकास परिषद, ठाणे यांच्या वतीने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच मंत्री प्रताप सरनाईक यांना मराठवाडा मित्र पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
मराठवाडा जनविकास परिषद, ठाणे यांच्या वतीने रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत ठाण्यातील गडकरी रंगायतन, तलावपाळी येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा ‘मराठवाडा भूषण’ आणि ‘मराठवाडा रत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
प्रशासकीय क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रासाठी पद्मश्री श्रीरंग ऊर्फ दादा लाड, शैक्षणिक क्षेत्रासाठी डॉ. मंगेश कराड, पत्रकारिता क्षेत्रासाठी अतुल कुलकर्णी, सुधारणा क्षेत्रासाठी डॉ. मुकुंद अडसूळ आणि क्रीडा क्षेत्रासाठी सनी फुलमाली यांनाही ‘मराठवाडा रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
या सोहळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे प्रमुख अतिथी, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे भूषविणार आहेत.
कार्यक्रमात गिरीश घाटे यांचे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जीवनावर व्याख्यान तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाची आणि सामाजिक योगदानाची आठवण करून देणाऱ्या या सोहळ्याकडे ठाण्यातील मराठवाडावासीयांचे लक्ष लागले आहे. यावेळी संस्थेचे डॉ.अशोक नांदापूरकर, संजय पोलसाने, संतोष काशिद, दिलीप सपाटे ,डॉ. राहुल कुलकर्णी, पांडुरंग घुले, डॉ. कारभारी खरात, कुणाल बोंगाणे, नितीन लांडगे, बलभीम खोमणे, नितीन कदम, डॉ. अविनाश भागवत आदींनी या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

















