दहाव्या म्हाडा लोकशाही दिनात १० अर्जांवर सुनावणी;
अर्जदारांना दिलासा
संजीव जयस्वाल यांच्या निर्णयांनी लोकाभिमुखतेचे दर्शन
मुंबई, १५ एप्रिल (प्रतिनिधी) — महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आयोजित दहावा लोकशाही दिन मंगळवारी वांद्रे (पूर्व) येथील गृहनिर्माण भवनात पार पडला. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात नागरिकांच्या १० अर्जांवर सुनावणी करण्यात आली.
या लोकशाही दिनात अर्जदारांच्या तक्रारींवर तत्काळ निर्णय घेऊन त्यांना दिलासा देण्यात आला. या निर्णयांमधून म्हाडाच्या प्रशासनातील संवेदनशीलता आणि लोकाभिमुखतेची झलक स्पष्टपणे दिसून आली.
ठाण्यातील संकेत क्रमांक ३६८ मधील सदनिकेसाठी यशस्वी ठरलेल्या मोहम्मद खान यांना विकासकाने विलंबित भरणा केल्यामुळे आकारलेल्या व्याजातून रु. १.७० लाख माफ करण्यात आले.
तसेच, गिल्बर्ट झेवियर यांचा अंधेरीतील पीएमजीपी कॉलनीतील सदनिकेच्या हस्तांतरणाचा अर्ज मंजूर करून, तात्काळ हस्तांतरण करण्याचे निर्देश देण्यात आले.
फारूक शेख यांनी केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील फसवणुकीच्या अर्जावर महिन्याभरात निर्णय देण्याचे आदेश दिले गेले, तर गिरणी कामगार विठ्ठलदास खेडेकर यांच्या पात्रतेबाबतचा निर्णय १५ दिवसांत घेण्याचे निर्देश देण्यात आले.
पुणे मंडळातील प्रधानमंत्री आवास योजनेतील अर्जदार आनंद खिलारे यांना आकारण्यात आलेल्या वाढीव रकमेबाबतही शासन कर वगळता उर्वरित रक्कम कमी करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दिले.
या लोकशाही दिनामुळे म्हाडाकडून होणाऱ्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अधिक दृढ झाले असून नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास अधिक बळकट झाला आहे.




















