मुंबईला हादरवणाऱ्या अशोक जोशीची थरारक कहाणी
मुंबई… १९८० चे दशक….गोळ्यांचा आवाज, गँगवॉर, खंडणी आणि अंडरवर्ल्डच्या रक्तरंजित संघर्षाने शहर हादरत होतं. दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, छोटा राजन, वरदराजन… या नावांसोबत आणखी एक नाव लोकांच्या चर्चेत होतं—अशोक जोशी.
काहींसाठी तो कुख्यात गँगस्टर होता, तर कांजुरमधील अनेकांसाठी तो ‘अशोक भाऊ’. इतकंच नव्हे, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ परिसरात ‘अशोक नगर’ उभं राहिल्याचं आणि दरवर्षी त्याची पुण्यतिथी साजरी केल्याचंही सांगितलं जातं.
कर्नाक बंदरातून कांजुरपर्यंत…
अशोक जोशी सुरुवातीला कर्नाक बंदर, भायखळा आणि मस्जिद बंदर परिसरात छोट्या गुन्हेगारी टोळीसह सक्रिय होता. तस्करी, खंडणी आणि सुपारी हत्यांसारख्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव पोलिसांच्या रडारवर आलं. १९७० च्या दशकाच्या अखेरीस मुंबई पोलिसांनी अनेक गुंडांना तडीपार केलं आणि त्यात अशोक जोशीचाही समावेश होता.त्यानंतर त्याने कांजुरगावातील हनुमान गल्लीत आपला अड्डा हलवला आणि इथूनच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अध्याय सुरू झाला.
‘अशोक भाऊ’ कसा बनला?
कांजुरमध्ये त्या काळी स्थानिक गुंडांची दहशत होती. महिलांची छेडछाड, वृद्धांना त्रास आणि सामान्य नागरिकांवर अत्याचार हे प्रकार सुरू होते. अशोक जोशीने या गुंडांविरोधात उभं राहत स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली. त्यामुळे अनेक स्थानिक नागरिक त्याला ‘अशोक भाऊ’ म्हणून संबोधू लागले.
त्यामुळे तो केवळ गँगस्टर राहिला नाही, तर काही लोकांच्या नजरेत स्थानिक संरक्षक म्हणूनही त्याची प्रतिमा तयार झाली. मात्र, त्याचवेळी त्याची गुन्हेगारी टोळीही वेगाने विस्तारत होती.
हजारो गुंडांची टोळी
१९८० च्या दशकात अशोक जोशीची टोळी मुंबईतील सर्वात मोठ्या टोळ्यांपैकी एक मानली जात होती. त्याच्या टोळीत महेंद्र डोलस उर्फ माया डोलस आणि दिलीप बुवा यांसारखे कुख्यात गुंड होते.
मन्या सुर्वेपासून अरुण गवळीपर्यंत…
अशोक जोशीचा संबंध मन्या सुर्वेच्या टोळीशी जोडला जातो. पुढे तो अरुण गवळीचा जवळचा सहकारी बनला. विक्रोळी, कांजूरमार्ग आणि आसपासच्या भागात त्याचा मोठा प्रभाव होता.
सतिश राजेची हत्या… आणि सुरू झाला मृत्यूचा काऊंटडाउन
दाऊद इब्राहिमचा विश्वासू आणि आर्थिक व्यवहार सांभाळणारा सतिश राजे हा डी-गँगमधील अत्यंत महत्त्वाचा माणूस होता.
२१ नोव्हेंबर १९८८ रोजी सतिश राजेची हत्या झाली. या हत्येचं नियोजन अशोक जोशी आणि अरुण गवळी यांनी केल्याचं अंडरवर्ल्डमध्ये बोललं जातं. या घटनेने दाऊद संतापला.
ज्याने सतिश राजेचा घात केला…
त्याच ड्रायव्हरने अशोक जोशीलाही फसवलं!
सतिश राजेचा चालक शामसुंदर नायर कथितपणे अशोक जोशीच्या संपर्कात आला. पुढे तोच अशोक जोशीचा चालक बनला. पण हा विश्वासच त्याच्या जीवावर बेतला.
४ डिसेंबर १९८८… पहाटेचा रक्तरंजित सापळा
४ डिसेंबर १९८८ रोजी पहाटे अशोक जोशी आपल्या मारुती ८०० मधून पुण्याकडे निघाला. पनवेलजवळ पोहोचताच समोर संशयास्पद गाड्या दिसल्या. चालक शामसुंदर नायरने अचानक गाडी थांबवली आणि स्वतः बाहेर पळाला. तेवढ्यात चारही बाजूंनी गोळीबार सुरू झाला.
विश्वासघात लक्षात येताच अशोक जोशीने पळणाऱ्या नायरवर गोळ्या झाडल्याचं सांगितलं जातं. मात्र, तो स्वतः वाचू शकला नाही. छोटा राजनच्या नेतृत्वाखालील हल्लेखोरांनी, दाऊद इब्राहिमच्या आदेशावरून हा हल्ला केल्याचा दावा केला जातो. गोळ्यांच्या वर्षावात अशोक जोशीचा मृत्यू झाला.
मृत्यूनंतरही संपली नाही चर्चा…
अशोक जोशीच्या मृत्यूनंतर त्याच्या टोळीतील महेंद्र डोलस उर्फ माया डोलस याने स्वतंत्र टोळी स्थापन केली. दुसरीकडे, कांजुर परिसरात अशोक जोशीबद्दल आजही वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. काही जण त्याला कुख्यात गुंड म्हणतात, तर काही त्याला गरिबांना मदत करणारा ‘रॉबिन हूड’ म्हणून आठवतात.
इतिहास मात्र एकच सांगतो—मुंबई अंडरवर्ल्डच्या रक्तरंजित दशकात अशोक जोशी हे नाव दुर्लक्षित करता येणार नाही. त्याच्या आयुष्याभोवती फिरणाऱ्या अनेक कथा आजही तितक्याच चर्चेत आहेत आणि म्हणूनच ‘अशोक जोशी l’ हे नाव अजूनही मुंबईच्या गुन्हेगारी इतिहासात गूढ, वादग्रस्त आणि तितकंच चर्चेचं राहिलं आहे.




















