कोपरगावचे शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र दयनीय अवस्थेत
सुधारणांची तातडीची गरज; शेतकरी वर्गाची मागणी
कोपरगाव, दि. २४ (दिलीप गायकवाड) –
कोपरगाव तालुक्यातील अहिल्यानगर येथे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या अखत्यारीत येणारे शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र सध्या उध्वस्त आणि दुर्लक्षित अवस्थेत असून, या प्रक्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी शेतकरी वर्गाने तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे.

सुमारे ३०० एकर क्षेत्रफळ असलेल्या या प्रक्षेत्रात केवळ १५० एकरवर चारा उत्पादन घेतले जात आहे, तर उर्वरित जमीन पडीत पडली आहे. सध्या प्रक्षेत्रात २०० गायींचे संगोपन केले जात असून त्यापैकी काही गायींकडून दररोज साधारणतः २ लिटर दूध मिळते, जे गोदावरी दूध संघास दिले जाते. याशिवाय वळू, वासरं व इतर जनावरांचेही पालन केले जाते. १५ कर्मचारी येथे कार्यरत असून जनावरांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. शेनखत तयार करून शेतीसाठी वापर करण्यात येतो.

कधीकाळी या प्रक्षेत्रात कार्यरत असलेले कुक्कुटपालन केंद्र सध्या बंद असून, २५० एकर जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करण्यात आली आहे. याचा वापर संजीवनी ऊस कारखाना, गोदावरी दूध संघ व इतर शासकीय प्रकल्पांकरिता होतो.
प्रत्यक्ष भेटीअंती रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था, निष्क्रिय गोठे आणि गोडाऊन, तसेच परिसरातील सर्वसामान्य अव्यवस्था स्पष्टपणे निदर्शनास आली. उपस्थित डॉ. सोनवणे व डॉ. गाडेकर, तसेच निवासी लिपिक साळुंके यांनी पाण्याच्या कमतरतेचा व औषध खरेदीसाठी लागणाऱ्या परवानग्यांचा मुद्दा उपस्थित केला. औषध खरेदीसाठी लागणाऱ्या परवानग्यांचा मुद्दा उपस्थित केला. औषध खरेदीचे बिल मंडळ कार्यालयाकडे पाठवून नागपूर येथून मंजुरी घेतली जाते, अशी माहिती देण्यात आली.
स्थानिक गावकरी व शेतकरी वर्गाने शासनाकडे मागणी केली आहे की, या प्रक्षेत्राची तातडीने पाहणी करून सुधारणा करण्यात याव्यात. प्रचंड क्षेत्रफळ असलेले हे प्रक्षेत्र अधिक कार्यक्षमतेने वापरण्याची आवश्यकता असून, शासनाने यासाठी तातडीने पावले उचलावीत, असेही त्यांचे म्हणणे आहे.
दुधासंबंधी गोदावरी दूध संघाचे संचालक श्री गाडवे यांना विचारे असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.




















