ठाणे, दि.३१ : अजय मगरे
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील शुभ दीप निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत आगामी मुंबईसह इतर महानगरपालिका निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला भाजप व शिवसेनेकडून काही वाढीव जागा देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी इतर महापालिकांमध्ये आरपीआयला देण्यात आलेल्या जागांचे नियोजन तसेच मुंबई जिल्हा नियोजन समितीसह विविध समित्यांवर आरपीआयच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची आग्रही मागणी आठवले यांनी केली. यावर आरपीआयकडून कार्यकर्त्यांची यादी प्राप्त झाल्यास सकारात्मक भूमिका ठेवून समित्यांमध्ये प्राधान्याने आरपीआय कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.


















