नगर रचना विभागाकडे ले-आऊट नकाशा, मंजुरी व चौकशीची मागणी…
कोपरगाव, दि. १४ : दिलीप गायकवाड
कोपरगाव येथील निवारा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. या हौसिंग सोसायटीच्या २७३ सभासदांनी नगरपरिषदेच्या नगर रचना विभागाकडे लेखी निवेदन देऊन आपल्या सोसायटीचा अधिकृत ले-आऊट नकाशा, बांधकाम परवानगी व मंजुरीची कागदपत्रे तत्काळ उपलब्ध करून देण्याची एकमुखी मागणी केली आहे.सोसायटीचे सदस्य मनोज बाबुराव निलक यांच्या नेतृत्वाखाली नगर रचना अधिकारी श्रीमती पिंगळे यांना हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, दि. ११ एप्रिल १९८७ रोजी नोंदणीकृत झालेल्या (नोंदणी क्र. १९०१/८७) या सोसायटीतील घरे वितरीत होऊनही आजतागायत कोणत्याही सभासदाला अधिकृत नकाशा अथवा मंजुरीची कागदपत्रे मिळालेली नाहीत.

सभासदांनी मांडलेल्या समस्यांमध्ये सोसायटीतील रस्ते, गटारी व उघड्या जागा अद्याप स्पष्ट नाहीत, सोसायटीचे कार्यालय कुठे गेले याचा पत्ता नाही, हनुमान मंदिराच्या सभामंडपात अनधिकृत पार्किंग होत असून ते थांबवावे, तसेच खडकी–टाकळी रस्त्यावरील आडव्या भिंतीमुळे नागरिकांना ये–जा करताना होणारा त्रास दूर करून तो रस्ता खुला करावा, अशा अनेक मुद्द्यांचा समावेश आहे.
रायगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज निलक यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, सोसायटीतील सर्व भूखंडांची चौकशी करून नवीन कायद्यानुसार सभासदांना स्वतंत्र उतारे मिळावेत व बांधकामांची उच्चस्तरीय चौकशी करावी.

सभासदांनी स्पष्ट केले की, अधिकृत कागदपत्रांच्या अभावामुळे त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येत नाही, तसेच घरे विक्री अथवा बँकेत कर्जासाठी गिरवी ठेवणेही शक्य होत नाही. भूखंड गट क्रमांक २०४/४५१ व २०४/४६ मध्ये ले-आऊट नुसारच सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
सभासदांचा सवाल आहे की, जर मंजुरीची कागदपत्रे अस्तित्वात असतील, तर ती माहिती द्यावी आणि नसतील, तर नगर रचना विभागाने अशा बांधकामांना परवानगी कशी दिली याचा खुलासा करावा.
या निवेदनासोबतच यापूर्वी विविध शासकीय कार्यालयांकडे पाठवलेल्या अर्जांच्या प्रतीही जोडण्यात आल्या आहेत. सोसायटीतील मोकळ्या जागा सभासदांच्या ताब्यात देऊन त्यांचा कायदेशीर हक्क सुनिश्चित करावा, अशीही मागणी सभासदांनी केली आहे.




















