मुंबईच्या राजकारणात मोठी घोषणा
मुंबई : मंगेश म्हात्रे
महानगरपालिकेच्या सत्ताकारणात मोठी घडामोड घडली असून भारतीय जनता पक्षाने महापौरपदाच्या उमेदवारीसाठी रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून नगरसेवक संजय शंकर घाडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी राखीव असल्याने मुंबईला पुन्हा महिला महापौर मिळणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. प्रभाग क्रमांक १३२ च्या नगरसेविका रितू तावडे यांच्यावर भाजपने विश्वास दाखवत त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, प्रभाग क्रमांक ५ मागाठाणेचे नगरसेवक संजय घाडी यांना शिवसेना शिंदे गटाने उपमहापौरपदाचे तिकीट देत दिले आहे.
शिवसेनेचे परिपत्रक जारी
शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौरपदासाठी शिवसेना–भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय शंकर घाडी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. हे पद सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी असणार असल्याचं संबंधित परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
महापौर आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारीमुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली असून आगामी निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


















