कोपरगाव : दि.२, किशोर शेलार,
कोपरगाव शहरातील रुग्णालये, शाळा तसेच न्यायालय परिसराच्या १०० मीटर परिघाला ‘शांतता क्षेत्र’ (साइलेंट झोन) घोषित करून ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणावे, अशी मागणी ‘माझं गाव माझा अभिमान’ मोहिमेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना स्मरणपत्र देण्यात आले.
मोहिमेचे प्रतिनिधी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, यापूर्वी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी नगरपरिषदेकडे निवेदन देऊन शहरातील रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालय परिसराभोवती १०० मीटर क्षेत्र ‘शांतता क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम २००० आणि मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण आणण्याची विनंती करण्यात आली होती.
मात्र, अद्याप या मागणीवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शहरात वाढत्या ध्वनी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय, शाळा आणि न्यायालय परिसरात शांतता राखण्यासाठी ‘साइलेंट झोन’ची अंमलबजावणी तातडीने करणे आवश्यक असल्याचे मोहिमेतर्फे सांगण्यात आले आहे.
याबाबत नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून ध्वनी प्रदूषण नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी ‘माझं गाव माझा अभिमान’ मोहिमेच्या वतीने करण्यात आली आहे. विनय भगत, मयुर आव्हाड, अमित आढाव, व विजय जाधव, यांनी निवेदन देऊन या सोबत ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या पत्राची प्रत व शासन निर्णयाची प्रतही जोडून देण्यात आली आहे.




















