नांदरच्या चिमुकल्या भावंडांच्या शोधमोहीमेला मोठे यश; पेटी पुलाजवळ कालव्यात आढळला आठ वर्षीय आरुषचा मृतदेह, संतोष कांबळे व एनडीआरएफ पथकाने बाहेर काढले
दावरवाडी,१८.(अभिजीत सोनवणे)
नांदर : पैठण तालुक्यातील नांदर येथे जायकवाडीच्या डाव्या कालव्यात बेपत्ता झालेल्या दोन सख्ख्या भावांपैकी आठ वर्षीय आरुष परमेश्वर रोडगे याचा मृतदेह घटनेच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि. १८) सकाळी अकराच्या सुमारास नांदर, इंदेगाव व बरमगाव शिवारातील पेटी पुलाजवळ आढळून आला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून दुसरा चिमुकला शाम रोडगे याचा शोध अद्याप सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १६) मुलांचे वडील सोमनाथ ऊर्फ परमेश्वर दामोदर रोडगे (वय ३०) यांनी आपल्या दोन्ही मुलांना जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेनंतर दोन्ही बालकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ पथक, पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात येत होती.
दरम्यान, बुधवारी सकाळी शोधमोहीम सुरू असताना नांदर येथील तरुण संतोष कांबळे यांना पेटी पुलाजवळ कालव्याच्या परिसरात आरुषचा मृतदेह दिसून आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता एनडीआरएफच्या पथकाच्या मदतीने कालव्यात उतरून आरुषचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर गावकरी आणि पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
तिसऱ्या दिवशी एका चिमुकल्याचा मृतदेह सापडल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुसरा मुलगा शाम रोडगे याचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ पथक आणि स्थानिक नागरिकांकडून शोधमोहीम सुरूच आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे नांदर परिसरासह संपूर्ण पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
दुसऱ्या चिमुकल्याच्या शोधाकडे सर्वांचे लक्ष
आरुषचा मृतदेह आढळल्यानंतरही दुसरा बालक शाम याचा शोध लागलेला नसल्याने कुटुंबीयांसह ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. कालव्याच्या पाण्यात शोधमोहीम सुरू असून शामचा शोध लागण्याची प्रतीक्षा सर्वांना आहे.



















