एक महिना इंटरनेट आणि ऐतिहासिक पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यास; तब्बल २५ दिवसांच्या मेहनतीतून किल्ल्याची उभारणी, शिवरायांच्या गड-किल्ल्यांचा इतिहास नागरिकांसमोर
ठाणे, दि.१३.( अजय मगरे)
कला आणि सांस्कृतिक शहर म्हणून ठाणे शहराची एक वेगळी ओळख आहे. याच सांस्कृतिक परंपरेला ऐतिहासिक वारशाची जोड देत ठाण्यातील समतानगर परिसरात एकता मित्र मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त आकर्षक असा ‘रायगड रक्षक’ किल्ला साकारण्यात आला आहे. केवळ दिवाळीची सजावट किंवा किल्ल्याची प्रतिकृती उभारणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि रायगडाच्या संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आसपासच्या किल्ल्यांचा इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या मागील मुख्य हेतू आहे.
रायगड किल्ला हा प्रत्येक शिवप्रेमीला परिचित आहे. मात्र रायगडाच्या आजूबाजूला असलेले किल्ले, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि रायगडाच्या संरक्षणातील त्यांची भूमिका याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नाही. हीच ऐतिहासिक माहिती नव्या पिढीला आणि नागरिकांना व्हावी, या विचारातून मंडळाने ‘रायगड रक्षक’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.
विशेष म्हणजे, हा किल्ला उभारण्यापूर्वी मंडळाच्या सदस्यांनी तब्बल एक महिना इंटरनेट आणि विविध ऐतिहासिक पुस्तकांचा अभ्यास करून माहिती गोळा केली. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे नियोजन करून अवघ्या २५ दिवसांत हा किल्ला उभारण्यात आला.
या किल्ल्याच्या उभारणीत सुयोग भोसले, समीर पाथरे, स्वराज जाधव, प्रसन्न पवार आणि अमित गाडगे यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच मंडळातील सर्व लहान मुलांनीही ऐतिहासिक माहिती संकलन आणि या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. लहान वयातच मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि स्वराज्याची ओळख व्हावी, हा या उपक्रमामागील महत्त्वपूर्ण उद्देश आहे.
दिवाळीच्या निमित्ताने किल्ला उभारण्याची परंपरा जपत इतिहासाची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचा एकता मित्र मंडळाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. मनोरंजनासोबतच इतिहासाची ओळख करून देणारा ‘रायगड रक्षक’ किल्ला नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

















