चॉकलेट-वडापावचे आमिष दाखवून दोन मुलांना जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकल्याचा पित्यावर आरोप; पाचोड पोलिसांकडून आरोपी ताब्यात, बालकांचा शोध सुरू
पैठण,१९.( अभिजीत सोनवणे )
पैठण तालुक्यातील नांदर शिवारात सोमवारी रात्री माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. चॉकलेट आणि वडापावचे आमिष दाखवून स्वतःच्या दोन चिमुकल्या मुलांना जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकल्याचा गंभीर आरोप त्यांच्या वडिलांवर करण्यात आला आहे. या घटनेने नांदर परिसरासह संपूर्ण पैठण तालुक्यात खळबळ उडाली असून, दोन्ही बालकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमनाथ रोडगे (वय ४०) याने आपली श्याम (वय ५) आणि आर्यन (वय ७) या दोन मुलांना चॉकलेट व वडापाव देण्याचे आमिष दाखवून जायकवाडीच्या डाव्या कालव्याजवळ नेले. त्यानंतर दोन्ही मुलांना कालव्याच्या पाण्यात फेकल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित पित्याला ताब्यात घेतले असून, प्राथमिक चौकशीत त्याने या घटनेची कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, कालव्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा शोध सुरू असून, अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
या घटनेतील सर्वांत हृदयद्रावक बाब म्हणजे, या चिमुकल्यांनी वडिलांकडे केलेली आर्त विनवणी. मुलांच्या आईसह नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. ज्या वडिलांकडून मुलांच्या सुरक्षिततेची अपेक्षा असते, त्यांच्यावरच आपल्या पोटच्या गोळ्यांना कालव्यात फेकल्याचा आरोप झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
दोन निरागस बालकांच्या शोधाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, या घटनेने नांदर परिसरासह पैठण तालुका सुन्न झाला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



















