बेकायदेशीर डर्ट बाईक्स विक्रीप्रकरणी कारवाईची मागणी; अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन
कोपरगाव, दि.२५ ( दिलीप गायकवाड )
शहरात बेकायदेशीरपणे डर्ट बाईक्सची विक्री होत असल्याचा आरोप करत, संबंधित विक्रेते आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्याची मागणी ‘माझं गाव माझा अभिमान’ (कोपरगावकर) संघटनेने केली आहे. याप्रकरणी प्रांताधिकारी (शिर्डी) आणि तहसीलदार (कोपरगाव) यांनी लेखी आदेश देऊनही श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाकडून अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. याच्या निषेधार्थ बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ पासून अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

कोपरगाव शहरात विनापरवाना डर्ट बाईक्सच्या कर्कश आवाजामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या प्रश्नावर संघटनेने २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान सलग तीन दिवस आमरण उपोषण केले होते. त्यावेळी शिर्डीच्या प्रांताधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. तसेच २९ ऑक्टोबर रोजी श्रीरामपूर आरटीओ अधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा संघटनेने केला आहे.
दरम्यान, संबंधित दुकानदाराने डर्ट बाईक्सची विक्री बंद केल्याचे प्रशासनाला सांगितले असले, तरी प्रत्यक्षात विक्री सुरू असल्याचे पुरावे संघटनेकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी सोशल मीडियावर ‘दिव्यका परदेशी’ हिच्या माध्यमातून संबंधित शोरूममधील डर्ट बाईक्स उपलब्ध असल्याची जाहिरात करणारी रील प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच गाड्यांची विक्री झाल्याचे व्हिडिओ पुरावेही संघटनेकडे असल्याचे सांगण्यात आले.
यासंदर्भात १३ नोव्हेंबर रोजी संघटनेने निवेदन दिल्यानंतर तहसीलदार, कोपरगाव यांनी १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पत्र काढून श्रीरामपूर आरटीओ आणि कोपरगाव शहर पोलीस निरीक्षकांना तातडीने कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या आदेशानंतरही कारवाई झाली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये संबंधित दुकानदाराविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्या कलम २१ नुसार कारवाई करणे, तसेच बेकायदेशीर डर्ट बाईक्स जप्त करून संबंधित शोरूम सील करण्याचा समावेश आहे.
२५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या बेमुदत आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी आरटीओ आणि पोलीस प्रशासनाची राहील, असा इशाराही संघटनेने दिला आहे. संघटनेच्या वतीने विनय भगत, मयूर आव्हाड आणि विजय जाधव यांनी ही भूमिका मांडली आहे.




















