दावरवाडी, दि. १४.( प्रतिनिधी )
पैठण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वातावरण तापू लागले असून, दावरवाडी जिल्हा परिषद गट ओबीसी महिलेसाठी राखीव सुटल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. दावरवाडी गण ओबीसी महिलेसाठी तर नांदर गण सर्वसाधारण पुरुषासाठी राखीव असल्याने संभाव्य उमेदवार मतदारसंघात भेटीगाठी घेत असल्याचे चित्र आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक उमेदवारांमध्ये खा. संदीपान भुमरे व आ. विलास भुमरे यांचे विश्वासू, दावरवाडी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र वाघमोडे यांच्या सुविद्य पत्नी जयश्री राजेंद्र वाघमोडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
जयश्री वाघमोडे या सुशिक्षित कुटुंबातून आलेल्या असून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व राजकीय कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केल्यामुळे त्या जनतेच्या मनातील चेहरा बनल्या असून, दावरवाडी गटातील मतदारांमध्ये त्यांचे नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.
दरम्यान, शिंदे शिवसेनेकडून विद्यमान सरपंच सीमा ज्ञानेश्वर जाधव, मंगल भगवान तांगडे, वर्षा रेवणनाथ कर्डिले, शोभा सोरमारे; राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून जयश्री शेषनारायण तांगडे तर भाजपकडून प्रिती किशोर तांगडे इच्छुक उमेदवार आहेत.
पंचायत समितीसाठी नांदर गणातून माजी सरपंच प्रा. संदीप काळे, नानेगावचे सरपंच अनिल बोधने, प्रविण काळे इच्छुक असून, काँग्रेसकडून उदयसेन रामचंद्र काळे तर इतरांमध्ये माऊली काळे हेही भावी उमेदवार म्हणून मतदारसंघात सक्रिय दिसत आहेत.




















