दावरवाडी, दि.३०(अभिजीत सोनवणे)
पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील कुलदैवत व नवसाला पावणारी देवी श्री रेणुकादेवी यात्रेची जय्यत तयारी झाली आहे. गुरुवार दि २ एप्रिल रोजी पहाटे ४-ते ६ वाजेपर्यंत हनुमान जन्मोत्सव व श्री रेणुकादेवी यात्रा महोत्सवाचे आयोजन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले.
तीन दिवस चालणाऱ्या यात्रेस गुरुवारी पहाटे हनुमान जन्मोत्सव, दूपारी ४-ते ६ देवीच्या मंदिरापासुन बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम, रात्री १०-ते३ भव्य छबीना व पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. शुक्रवारी पहाटे ४-ते ६ शोभेची दारु सोडण्यात येईल, सकाळी ९ वाजता हजर्या होतील व दूपारी १ ते ५ वाजता कुस्तांचा जंगी आखाडा होणार आहे.
या मल्लांना ११ हजार १११ रुपयांची बक्षिसे समिती मार्फत दिली जाणार आहे. पाचोड पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन पंडीत व फौजदार गोविंद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी या यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे , असे आवाहन यात्रा समितीने केले आहे.




















