मोठ्या दुर्घटनेची भीती; धोकादायक इमारतीवर तातडीने कारवाईची नागरिकांची मागणी
कोपरगाव : दिलीप गायकवाड
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील विद्यनेश्वर चौक परिसरातील इंदिरा शॉपिंग सेंटर ही इमारत अनेक वर्षांपासून नगरपरिषदेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत असूनही अद्याप तिच्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रथमदर्शनीच ही इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी इमारतीचे बांधकाम खचले असून पडझड झालेली आहे. अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असलेल्या या इमारतीत आजही दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि कार्यालये सुरू आहेत. परिसरात दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते. तसेच रस्त्यालगत हातगाड्या व फेरीवाले व्यवसाय करत असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. अशा परिस्थितीत ही जीर्ण आणि धोकादायक इमारत नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करत असल्याची भावना कोपरगाव नागरिक व्यक्त करीत आहेत.
विशेष म्हणजे, नगरपरिषदेने या इमारतीला धोकादायक घोषित करूनही तिच्या दुरुस्ती, सुरक्षितीकरण अथवा पाडकामाबाबत कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कोपरगाव शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर होऊनही अनेक इमारती आजही त्याच अवस्थेत उभ्या आहेत. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी नगरपरिषदेने तातडीने संबंधित इमारतीवर कठोर कारवाई करून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी जोरदार मागणी दक्ष नागरिकांकडून होत आहे.




















