महानगरपालिका प्रशासनावर कोणती कारवाई केली? नोटीस बजावली का? याबाबत पोलिसांकडे लेखी खुलासा आणि नोटिसीची प्रत देण्याची मागणी
ठाणे : वागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्क परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या संरक्षण भिंतीसंदर्भात घडलेल्या प्रकारावरून शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या कथित निष्काळजीपणाबाबत तसेच वागळे इस्टेट पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर लेखी खुलासा मिळावा, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे ठाणे महानगरपालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली, याची माहिती पोलिसांकडे मागण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी महानगरपालिका आयुक्त किंवा संबंधित सहाय्यक आयुक्तांना पोलिसांकडून नोटीस अथवा पत्र देण्यात आले आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. नोटीस बजावण्यात आली असल्यास त्याची प्रमाणित प्रत उपलब्ध करून द्यावी आणि नोटीस दिली नसल्यास त्यामागील कारणे लेखी स्वरूपात स्पष्ट करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय स्मारकाच्या संरक्षण भिंतीसंदर्भात नेमकी घटना कशी घडली, याला जबाबदार कोण आहे आणि प्रशासनाच्या कोणत्या स्तरावर निष्काळजीपणा झाला, याची चौकशी करण्यात आली आहे का, याचाही तपशील मागण्यात आला आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी कोणत्या उपाययोजना करणार आहेत, याबाबतही भूमिका स्पष्ट करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या सन्मानाचा प्रश्न हा केवळ एका राजकीय पक्षाचा किंवा समाजाचा विषय नसून तो संविधान, सामाजिक न्याय आणि संपूर्ण समाजाच्या अस्मितेशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ तोंडी आश्वासन न देता आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशी ठाम भूमिका शेतकरी कामगार पक्षाने मांडली आहे.
हे निवेदन शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद सु. साळवी आणि ठाणे शहराध्यक्ष ऋषिकेश प्र. तायडे यांच्या वतीने देण्यात आले. या प्रकरणाचा प्रशासनाकडून काय प्रतिसाद मिळतो आणि पोलिसांकडून कोणती पुढील कार्यवाही केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवेदनावेळी शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी, ठाणे शहराध्यक्ष ऋषिकेश तायडे, ठाणे शहर सरचिटणीस मुकेश भोईर, ठाणे शहर सचिव जयेश सपकाळे, संदीप गायकवाड, वागळे विभाग प्रभारी शिजू दासअपण, वागळे विभाग अध्यक्ष चंदन भारद्वाज, लोकमान्य-सावरकर नगर विभाग अध्यक्ष सागर धेंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




















