मुख्यमंत्री कार्यालयाशी थेट संपर्क साधत चौकशी वेगात करण्याचे निर्देश – मंत्री हसन मुश्रीफ
शासनाकडून अधिकृत आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही – सेन्ट्रल मार्ड..
मुंबई, दि.४ : अजय मगरे
फलटण येथील आत्महत्या केलेल्या डॉ संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी डॉक्टरांच्या सर्वच संघटनांनी कामबंद आंदोलन पुकारल्याने राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर रहिवासी डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) आंदोलोन सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मंत्रालयात तातडीची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला.

या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, तसेच सेन्ट्रल मार्डचे प्रतिनिधी डॉ. सचिन पाटील, डॉ. महेश तिडके, डॉ. कुणाल गोयल आणि डॉ. महेश गुरव उपस्थित होते. बैठकीत डॉ. मुंडे यांच्या आत्महत्येमागील कारणांवर सखोल चर्चा झाली.
मंत्री मुश्रीफ यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, “एका तरुण डॉक्टरचा जीव जाणे ही अत्यंत दुःखद घटना आहे. दोषींवर कठोर कारवाई होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी थेट संवाद साधत तपास वेगात पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, सेन्ट्रल मार्डने डॉ. मुंडे प्रकरणी न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. डॉक्टरांवरील वाढत्या कामाच्या ताणाबाबत आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही मार्डने केली आहे.
राज्य शासनाने या प्रकरणाकडे संवेदनशीलतेने पाहत आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रात डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी विविध ठिकाणी शांत आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.




















