इच्छुकांच्या गाठीभेटींना वेग; सर्वच पक्ष कार्यकर्ते निवडणूक मोडमध्ये…
पैठण, दि.२ : अभिजीत सोनवणे
पैठण तालुक्यातील दावरवाडी जिल्हा परिषद गट ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर नांदर गण सर्वसाधारण (पुरुष) म्हणून जाहीर झाला आहे. या गटात एकूण २४ गावांचा समावेश असून, सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

आरक्षण जाहीर होताच इच्छुक महिलांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या असून, गावोगावी राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिंदे गटाचे खा. संदीपान भुमरे व आ. विलास भुमरे यांच्या समर्थकांमध्ये जयश्री राजेंद्र वाघमोडे, सीमा ज्ञानेश्वर जाधव, वर्षा रेवनाथ कर्डिले, राहिबाई वाघ, ताराबाई वाघ, तर इतर गटात प्रिती तांगडे, उद्धव सेनेतून मीना वैद्य, महाविकास आघाडी व शेतकरी कामगार पक्षाकडून अर्चना सरोदे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.
काही इच्छुकांना पक्षाचे तिकीट निश्चित मिळाल्याच्या चर्चा असून, काहीजण सोशल मीडियावरून प्रचाराची सुरुवात करताना दिसत आहेत.
पंचायत समितीसाठीही चुरस:
नांदर गणासाठी शिंदे गटाकडून अनिल बोधने (सरपंच, नानेगाव) यांचे नाव आघाडीवर असून, माजी सरपंच संदीप काळे, सदस्य प्रविण काळे, शिवाजी मगरे, काँग्रेसकडून उदयसेन काळे, उद्धव सेनेतून मन्नाबाबा भोसले, तसेच ईश्वर कांबळे आणि माऊली काळे हे इच्छुक मैदानात आहेत.
मागील पंचवार्षिकात दावरवाडी गट शिवसेनेच्या ताब्यात होता. त्यामुळे हा गट आ. विलास भुमरे यांच्यासाठी निर्णायक मतदारसंघ ठरला होता. आता आरक्षणातील बदलानंतर पुन्हा एकदा या गटात कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




















