फवारणीपासून कोळपणीपर्यंत शेतीची कामे करण्यासाठी इलेक्ट्रिक कृषी वाहनाची निर्मिती; स्मार्ट शेतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
दावरवाडी, प्रतिनिधी
शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या कल्पकतेतून आणि जिद्दीच्या जोरावर शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक कृषी वाहनाची निर्मिती केली आहे. इंजिनिअर चंद्रकांत गुलाबराव खांडे यांनी AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक कृषी वाहन तयार करून शेती क्षेत्रात नवा प्रयोग केला आहे. त्यांच्या या अभिनव प्रयोगाची परिसरात चर्चा होत आहे.
खांडे ग्रीनटेक प्रा. लि. यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या या वाहनाचे नाव KGT AI AGRO EV असे आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर आधारित असलेले हे इलेक्ट्रिक वाहन शेतकऱ्यांची शेतीमधील विविध कामे अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या सहा बाय चार फुटांच्या जागेत बसणाऱ्या या चारचाकी कृषी वाहनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. फळबागा, तूर आणि कापूस यांसारख्या पिकांवर फवारणी करणे, कोळपणी तसेच शेतीशी संबंधित विविध कामांसाठी या वाहनाचा उपयोग करण्याची संकल्पना आहे.
या वाहनामध्ये AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मातीची माहिती, पिकांची सद्यस्थिती, उत्पादनासंबंधी माहिती, GPS लोकेशन आणि इतर कृषीविषयक माहिती मिळवण्याची सुविधा विकसित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. इंटरनेटच्या माध्यमातून ही माहिती शेतकऱ्यांच्या मोबाईलवर तसेच वाहनातील स्क्रीनवर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचवण्याचा प्रयत्न
शेतीमध्ये मजुरांची कमतरता, वाढता उत्पादन खर्च आणि आधुनिक यंत्रसामग्रीची गरज लक्षात घेऊन या वाहनाची निर्मिती करण्यात आली आहे. चार ते पाच मजुरांची कामे एकाच वाहनाच्या माध्यमातून करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प विकसित करण्यात आल्याचे इंजिनिअर चंद्रकांत खांडे यांनी सांगितले.
स्वतःच्या गावातच वाहनाचे अनावरण
या आधुनिक कृषी वाहनाचा शुभारंभ कोणत्याही मोठ्या शहरात न करता चंद्रकांत खांडे यांनी आपल्या दावरवाडी या मूळ गावी करण्याचा निर्णय घेतला.यावेळी रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नंदकुमार पठाडे,जि प सदस्या जयश्री राजेंद्र वाघमोडे, जिल्हा बॅंकेचे संचालक शाम तांगडे,पं स सदस्य उदयसेन काळे, भाऊसाहेब वाघ,सोसायटीचे चेअरमन राजेंद्र वाघमोडे,माजी जि प सदस्य,साधना कमलाकर एडके,माजी सरपंच अॅड डि डि जाधव, उपसरपंच प्रशांत भैय्या देशमुख,
मा.सरपंच प्रकाश देशमुख,गणपतराव माने,केदार शिंदे, गोपाल धारे, रमेश खांडे, प्रविण खांडे,संजय खांडे,शिध्दार्थ इंगळे आदींसह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शनिवार, दिनांक ६ नोव्हेंबर रोजी हजारो शेतकरी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या वाहनाचे अनावरण करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे यांच्या हस्ते वाहनाचे अनावरण करण्यात आले. यावेळी विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एका शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केलेला हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास शेतकऱ्यांचे श्रम कमी होऊन शेती अधिक कार्यक्षम होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे KGT AI AGRO EV या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष शेतातील कामगिरीकडे आता शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

















