मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार…
मुंबई, दि. २८ : अजय मगरे
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने राज्यभर महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असून अनेक गणेश मंडळे देखील सक्रियपणे या मोहिमेत सहभागी झाली आहेत.
गणेशमंडपात किंवा परिसरात आयोजित शिबिरांमध्ये भाविक व नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
शिबिरांमध्ये रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग आदी आजारांचे निदान केले जात असून तपासणीत आजार आढळल्यास संबंधित रुग्णांना शासनाच्या योजनेंतर्गत मोफत उपचार दिले जात आहेत. यासोबतच नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहितीही दिली जात आहे.
नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढावी यासाठी गणेश मंडळांकडून गेल्या आठवडाभर पत्रके, बॅनर यांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात आली. परिणामी, शिबिरांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
“गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणादरम्यान आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यामागचा उद्देश म्हणजे लोकांना त्यांच्या आरोग्याची जाणीव करून देणे. या उपक्रमातून हजारो नागरिकांना मोफत तपासणी व उपचारांची संधी मिळत असून हा आरोग्यसेवेतील लोकाभिमुख व जनहिताचा उत्तम आदर्श आहे,” असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.




















