दहावीच्या परीक्षेत मुलींची बाजी; गेल्या दशकात एकही विद्यार्थी नापास नाही
कोपरगाव : दि.८,दिलीप गायकवाड
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, कोपरगावातील ‘संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल’ने सलग दहाव्या वर्षी १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख अधोरेखित केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या दहा वर्षांत शाळेचा एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेला नसल्याने हा निकाल कोपरगावच्या शैक्षणिक वर्तुळात कौतुकाचा विषय ठरला आहे.
यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचे वर्चस्व पाहायला मिळाले. नारायणी नितीन शिंदे हिने ९४ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. आस्था किशोर देवडे हिने ८९ टक्के गुणांसह द्वितीय, तर साईश्री गणेश कानडे हिने ८८.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, उपाध्यक्ष किरण भोईर, विश्वस्त राजेंद्र सालकर, कैलास जाधव, पोपट झुरळे, विशाल झावरे, ॲड. शंकर यादव, मुख्याध्यापक सचिन मोरे, उपमुख्याध्यापिका वैशाली लोखंडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
शाळेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण निकालामुळे पालकांचा शाळेवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रियेलाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.
“गेल्या दशकापासून संत ज्ञानेश्वर स्कूलने शंभर टक्के निकालाची परंपरा केवळ टिकवली नाही, तर गुणवत्तेचाही आलेख सातत्याने उंचावला आहे. सलग दहा वर्षे एकही विद्यार्थी नापास न होणे, हे शिक्षकांच्या परिश्रमाचे आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे फलित आहे. आधुनिक शिक्षणासोबत मूल्यांची जोड देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कायम प्रयत्नशील राहील.” विशाल झावरे सर ( ट्रस्टी )यांनी माहिती दिली.




















