शहरभरात जल्लोष, मिरवणुकीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
कोपरगाव, दि. ३१ : दिलीप गायकवाड
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून प्रवास करत उषा गंगाधर पवार या कोपरगावच्या कन्येने अखेर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन क्लास वन अधिकारी बनण्याचं स्वप्न साकार केलं आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाने संपूर्ण कोपरगाव शहर अभिमानाने न्हाऊन निघालं आहे.
गेल्या आठ-नऊ वर्षांपासून उषाताई सतत प्रयत्नशील होत्या. असंख्य अपयश झेलत, खंबीरपणे प्रयत्न करत अखेर त्यांनी डीवायएसपी पद मिळवत यशाची शिखरे गाठली. या यशानंतर कोपरगाव शहरात उषाताईंचा भव्य सत्कार व मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यावेळी उषाताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आत्मविश्वास सर्वांनाच प्रेरणादायी ठरला. त्यांच्या आई, बहीण, भाऊ तसेच कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
आपल्या पहिल्या आनंद प्रतिक्रियेत उषाताईंनी बहुजन शक्ती न्यूजशी बोलताना सांगितले,
“मी आज जी झाली, त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाला, गुरूजनांना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना देते. त्यांच्या प्रेरणेतूनच मी कधीही हार मानली नाही.”
यशानंतर त्यांनी कोपरगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या या कृतीने परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले.
उषा पवार यांच्या या घवघवीत यशाबद्दल कोपरगाववासीयांनी अभिमान व्यक्त केला असून बहुजन शक्ती सामाजिक संस्थेने त्यांच्या भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.




















