धारावी किंवा वांद्रे येथील एका प्रभागाची उमेदवारीसाठी चाचपणी
मुंबई, दि. ८ : मंगेश म्हात्रे
मुंबई महापालिका निवडणुकीचं आरक्षण जाहीर होताच शहराच्या विविध प्रभागांत राजकीय तापमान चढू लागलं आहे. इच्छुक उमेदवारांनी स्थानिक जनसंपर्क मोहीमा सुरू केल्याने येणारी निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहेत. धारावी परिसरातही अशीच चर्चा वेगाने सुरू असून शिवसेना (ठाकरे गट) चे प्रमुख स्थानिक पदाधिकारी आशिष मोरे कोणत्या प्रभागातून रिंगणात उतरणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मोरे हे धारावी किंवा वांद्रे येथील एका प्रभागाची उमेदवारीसाठी चाचपणी करीत आहेत. २०१७ मध्ये त्यांच्या पत्नी हर्षला मोरे या मनसेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यानंतर दोघांनी संयुक्त शिवसेनेत प्रवेश केला. शिवाय २०१९ मध्ये आशिष मोरे यांनी शिवसेनेतून धारावी विधानसभेची निवडणूकही लढवली होती.
दरम्यान,२०२४ च्या महापालिका आरक्षणानुसार मोरे यांचा परंपरागत प्रभाग १८९ अनुसूचित महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे या प्रभागातून हर्षला मोरे पुन्हा उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे आशिष मोरे यांनी स्वतःसाठी पर्यायी प्रभाग म्हणून धारावी आणि वांद्रे या दोन्ही ठिकाणांची तपासणी सुरू केल्याचे कळते.
धारावीच्या राजकारणात दीर्घकाळ प्रभावी भूमिका बजावणारे आशिष मोरे हे स्थानिक पातळीवर मजबूत पकड असलेले नेते मानले जातात. शिवसेनेत फुटीनंतरही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत करून आपली निष्ठा कायम राखली आहे.




















