आरटीआय कार्यकर्ता व दोन सहकाऱ्यांविरुद्ध वागळे इस्टेट पोलिसात गुन्हा दाखल
ठाणे : प्रतिनिधी
वागळे इस्टेट येथील सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयात कार्यरत असलेल्या अन्न सुरक्षा महिला अधिकाऱ्याला बदनामीची धमकी देत खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरटीआय कार्यकर्ता दत्तात्रय पुजारी व दीपक बदक , जयसिंग पाटील सहकाऱ्यांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी श्रीमती शुभांगी अन्न सुरक्षा अधिकारी, या कर्तव्यावर असताना त्यांच्या कक्षात घड्याळ दुरुस्तीचे पैसे देत असतानाचा व्हिडीओ उपरोक्षपणे काढण्यात आल्याचा आरोप आहे. सदर व्हिडीओ शासकीय कामाच्या मोबदल्यात पैसे घेतल्याचा भास निर्माण करून सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली.
आरटीआय कार्यकर्ता दत्तात्रय पुजारी याने “व्हिडीओ व्हायरल करणार” अशी धमकी देत तक्रार थांबवण्यासाठी २० हजार रुपयांची तात्काळ मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार खोटा व बदनामीच्या उद्देशाने केल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.
प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात खंडणी, धमकी व बदनामीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी बहुजन शक्ती न्यूज’शी बोलतांना दिली.


















