कोपरगाव, दि.४ : दिलीप गायकवाड
कोपरगाव येथील जुना टाकळी रस्त्यावर देवकर वस्तीजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीसह खोल खड्यात पलटी झाल्याची घटना घडली. याबाबत माहिती देताना काँग्रेस किसान सेल्सचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले की, टाकळी नाका ते नक्षत्र मंगल कार्यालयापर्यंतचा संपूर्ण जुना टाकळी रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्ता अरुंद झाला असून, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मुरूम काढल्यामुळे रस्त्यालगत खोल खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरसारखी वाहने पलटी होण्याचे प्रकार वारंवार घडत असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
हा मार्ग कोपरगाव शहरात जाण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रमुख संपर्क मार्ग असून, भाजीपाला, दूध विक्री तसेच शाळा-काॅलेज विद्यार्थी याच रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे ग्रामस्थ, ग्रामपंचायत व तहसील प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह या रस्त्याची तात्काळ पाहणी करून दुरुस्तीचा ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी विजय जाधव यांनी केली आहे.




















