छत्रपती संभाजीनगर,दि.२७( सचिन एडके )
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देश व मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने वैजापूर तालुक्यातील गंगापूर येथे पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या उत्पादन केंद्रावर धाड टाकून 10 लाख 1 हजार 600 रुपयांचा माल जप्त केला.
गोपनीय माहितीच्या आधारे 22 जून 2026 रोजी दुपारी गंगापूर, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथील एम/एस यशरिच फूड्स अँड अॅग्रो एलएलपी (गट क्रमांक 106, कसोडा-रांजणगाव रोड) या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर प्लांटवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान ओमरिच, यशरिच आणि हायड्राशुअर या ब्रँडच्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचे पाच नमुने जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत 10 लाख 1 हजार 600 रुपये इतकी आहे.
सदर कारवाईत संबंधित व्यावसायिकांकडून परवाना नसताना विक्री करण्यात येत असल्याचे तसेच ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे आढळून आल्याने माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संबंधित आस्थापनास स्टॉप बिझनेस नोटीस देखील बजावण्यात आली आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सौ. पी. पी. सुरसे, श्री. एस. ए. केदार आणि श्री. वाय. डी. चिभडे यांनी केली. तसेच सहाय्यक आयुक्त श्री. विवेक पाटील आणि सहआयुक्त श्री. एस. आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.



















