कोपरगाव : विजय जावरे
कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत असून, अनेक वाहनचालकांना इंधनासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, केवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकच नव्हे तर ड्रममध्ये डिझेल घेण्यासाठी आलेल्या नागरिकांचीही मोठी गर्दी होत आहे. काही पेट्रोल पंपांबाहेर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.
पेट्रोल पंप चालकांकडून मर्यादित प्रमाणात इंधन दिले जात असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक ठिकाणी ग्राहकांना केवळ पाचशे ते हजार रुपयांपर्यंतच डिझेल दिले जात असल्याने शेतकरी आणि वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या पावसाळ्यापूर्वी शेतीच्या नागरणीची कामे सुरू असून ट्रॅक्टरसाठी डिझेलची मोठ्या प्रमाणात गरज असते. मात्र डिझेल टंचाईमुळे शेतनागरणीची कामे खोळंबत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वेळेत नागरणी न झाल्यास शेतीच्या कामांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वाहनचालकांनी प्रशासन आणि तेल कंपन्यांनी तातडीने इंधनपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. पुढील काही दिवसांत परिस्थिती सुधारते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




















