मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीडकऱ्यांना अजित पवारांची खास भेट…
मुंबई, दि.१५ : अजय मगरे
बीड जिल्ह्याच्या विकासात नवी क्रांती घडवणाऱ्या ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य शासनाने आजवर तब्बल २ हजार ९१ कोटी रुपये दिले असून, त्यात आणखी १५० कोटींची भर घालण्यात आली आहे. या निधीमुळे प्रकल्पाला चालना मिळून बीडकऱ्यांचे स्वप्न पूर्णत्वास जाणार आहे.
विशेष म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्यामुहूर्तावर, १७ सप्टेंबर रोजी ‘बीड-अहिल्यानगर’ या टप्प्यावरील रेल्वेसेवेचा शुभारंभ होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडकऱ्यांना दिलेली ही खास भेट ठरणार आहे.
हा रेल्वेमार्ग २७१ किलोमीटर लांबीचा असून, त्याचा एकूण खर्च ४ हजार ८०५ कोटी रुपये आहे. त्यातील अर्धा म्हणजेच २ हजार ४०२ कोटी रुपये राज्य शासनाचा हिस्सा आहे. आजवर शासनाने २ हजार ९१ कोटी २३ लाख रुपये दिले आहेत. त्यात आजच आणखी १५० कोटींची तरतूद करून निधी वितरित करण्यात आला.
पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून अजित पवार यांनी विमानतळ, रेल्वे आणि रस्ते विकासावर विशेष लक्ष केंद्रित करून मंत्रालयीन, विभागीय आणि जिल्हास्तरीय पातळीवर सातत्याने बैठका घेतल्या. त्याचा परिणाम म्हणून हा प्रकल्प गतीमान झाला असून, आता बीड जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणारा विकासप्रवास सुरू होणार आहे.
“अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्ग शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी आणि सामान्य जनतेसाठी विकासाला नवी गती देणार आहे. गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि वाहतूकसुविधा वाढवून बीडचा सर्वांगीण विकास साधणे हेच माझे ध्येय आहे,” असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

















