मुंबई, दि. ५ : अजय मगरे
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती न्या. चंद्रशेखर यांनी आज मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.
राजभवन येथे पार पडलेल्या छोटेखानी समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शपथविधी सोहळ्याला राजस्थान, झारखंड, दिल्ली, अलाहाबाद, कर्नाटक आणि मुंबई उच्च न्यायालयातील विद्यमान व सेवानिवृत्त न्यायाधीश उपस्थित होते.
शपथविधीनंतर राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी पुष्पगुच्छ देऊन न्या. चंद्रशेखर यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
….न्या. चंद्रशेखर यांचा जीवन परिचय….
न्या. चंद्रशेखर यांचा जन्म २५ मे १९६५ रोजी झाला. त्यांनी १९९३ मध्ये दिल्ली विद्यापीठातून एल.एल.बी. पदवी मिळवली व त्याच वर्षी वकिली व्यवसायास सुरुवात केली. १९ वर्षांच्या वकिली कारकिर्दीत त्यांनी सुमारे ३५०० खटल्यांमध्ये बाजू मांडली. यापैकी १४० हून अधिक प्रकरणांचे सर्वोच्च न्यायालयातील निवाडे अहवालित आहेत.
त्यांनी AICTE, झारखंड राज्य वीज मंडळ, बिहार गृहनिर्माण मंडळ, कृषी अनुसंधान परिषद यांसारख्या अनेक संस्थांचे प्रतिनिधित्व केले.
२०१३ मध्ये झारखंड उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर २०१४ मध्ये ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. २०२३-२४ या कालावधीत त्यांनी झारखंड उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले.
त्यानंतर त्यांची बदली मुंबई उच्च न्यायालयात झाली आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पदोन्नतीनंतर त्यांनी प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. आज त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पदाची औपचारिक शपथ घेतली.




















