मुंबई महापालिका निवडणुकीत ‘सातमकर फॅक्टर’ महायुतीसाठी ठरणार महत्वाचा?
मुंबई, दि. ३० : मंगेश म्हात्रे
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर काही काळ राजकीय विजनवासात गेलेले माजी नगरसेवक मंगेश सातमकर आता पुन्हा मैदानात उतरले असून, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातमकरांच्या पुनरागमनाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विशेष म्हणजे, सातमकरांनी वार्ड क्र. १७३ चे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांना शिंदे गटात प्रवेश देऊन महापालिका रणांगणात आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे सातमकर पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातमकरांचा अनुभव ‘ट्रम्प कार्ड’?
मुंबई महापालिकेत तब्बल ३२ वर्षे नगरसेवक म्हणून काम करताना सातमकरांनी शिक्षण समिती अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य अशा महत्वाच्या पदांवर भक्कम छाप पाडली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील निसटता पराभव वगळता त्यांनी लढवलेल्या प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवला आहे.
२०१५ ते २०२३ या काळात संयुक्त शिवसेनेत विभाग क्रमांक -९ चे विभागप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडताना सातमकरांनी भाजप-शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाच्या काळातही आपला प्रभाव टिकवून ठेवला होता.२०२३ साली सातमकरांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
वार्ड १७३ व १७५ वर पकड…
२००७ मध्ये प्रतीक्षा नगरमधून निवडणूक जिंकून आलेल्या सातमकरांना २०१२ आणि २०१७ मध्ये वार्ड आरक्षणामुळे संधी मिळाली नाही. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत प्रतीक्षा नगरचा पारंपारिक वार्ड बदल करत वार्ड क्रमांक १७५ निवडणूक लढवून विजय मिळवत आपली लोकप्रियता सिद्ध केली. सध्या सातमकर वार्ड १७३ आणि १७५ या दोन्ही ठिकाणी चाचपणी करत असून स्थानिक पातळीवरील कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत.
महायुतीत सातमकरांचे समीकरण…..
आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीकडून सातमकरांना पुढे केले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते. परंतु त्याच वेळी भाजप आणि ठाकरे गटाची रणनीती सातमकरांच्या संदर्भात काय असेल हे उत्सुकतेचे ठरणार आहे.
एकीकडे शिंदे गटासाठी सातमकरांचा अनुभव आणि कार्यकर्त्यांवरील पकड मोठी फायद्याची ठरू शकते, तर दुसरीकडे भाजप-ठाकरे गटाच्या राजकीय पाट्या मांडण्यात सातमकर केंद्रबिंदू असतील, हे मात्र निश्चित. रिलॅक्स झाल्यानंतर पुन्हा ऍक्टिव्ह झालेले मंगेश सातमकर हेच महापालिकेच्या राजकारणातील मोठे गेम चेंजर ठरतील का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

















