मुंबई | मंगेश म्हात्रे
घाटकोपर येथील राजावाडी हिंदू स्मशानभूमीत मृत्यू नोंदीसाठी दिल्या जाणाऱ्या पावत्या गुजराती भाषेत दिल्या जात असल्याचा प्रकार समोर आला असून, यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी तातडीने मराठी भाषेत पावत्या उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग सचिव अॅड. अभिषेक सावंत यांनी याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीत घाटकोपर येथील हिंदू स्मशानभूमीत मृत्यू नोंदीसाठी दिल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या पावत्या गुजराती भाषेत छापलेल्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मनसेच्या मते, महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असताना मुंबईतील स्मशानभूमीत गुजराती भाषेत पावत्या देणे योग्य नसून त्या तातडीने मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात याव्यात. अन्यथा या प्रकरणी मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पत्रातून देण्यात आला आहे.




















