राष्ट्रसेवेची प्रेरणा; यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार…
मुंबई : अजय मगरे
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) २०२५-२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेना, तेजपर्व सामाजिक संस्था आणि सुगी डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी बीकेसी येथील एमसीए क्रिकेट क्लब रिक्रिएशन सेंटरमध्ये भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. राष्ट्रसेवेचे ध्येय बाळगणाऱ्या युवा अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणारा हा सोहळा प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमास महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी समीर वानखेडे, मुंबईचे उपमहापौर संजय घाडी, शिवसेना उपनेते तथा माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना सचिव संजय मोरे, आमदार दिलीप (मामा) लांडे, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार पराग अळवणी, शिवसेना सचिव तथा शिव चित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार, शिवसेना सचिव ॲड. वैभव थोरात, शिवसेना उपनेते राजाभाऊ चौगुले, शिवसेना उपनेत्या आशाताई विचारे-मामिडी, नगरसेविका मिनलताई संजय तुर्डे, शिवसेना राष्ट्रीय सह-समन्वयक दिनेश शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी UPSC आणि MPSC परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी पाठविलेली अभिनंदन व गौरवपत्रेही विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. संदेशात विद्यार्थ्यांच्या परिश्रम, चिकाटी, शिस्तबद्ध अभ्यास आणि राष्ट्रसेवेच्या ध्येयाचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
UPSC परीक्षेत अखिल भारतीय क्रमवारीत (AIR) २६ वा क्रमांक मिळविणाऱ्या सुमती कदम, AIR ३१ चे सुशांत वडवकर, AIR ४४ चे अदिश तिवारी, AIR ४६ ची मोहिनी जगताप, AIR ६९ चे रोहित पवार, AIR ८१ चे अक्षय पवार, AIR ९४ चे शुभम पाटील, AIR १०२ चे दर्शन सूर्यवंशी आणि AIR १०६ ची ऋतुजा गायकवाड यांच्यासह अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच MPSC राज्यसेवा परीक्षेत उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेल्या पवन मंगरुळे, DYSP/ACP पदासाठी निवड झालेल्या मनीषा खेडेकर आणि गट-ब व गट-क परीक्षेत यशस्वी झालेल्या रुचा खैरनार यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीरा गुजर यांनी केले. प्रारंभी विनित गोरे प्रस्तुत ‘शब्दप्रभू’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून ज्येष्ठ कवी ग. दि. माडगूळकर आणि गुलजार यांच्या अजरामर गीतांचा सुरेल स्वराविष्कार सादर करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिक प्रशासन, नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले.
या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन शिवसेना सचिव, तेजपर्व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य सुधाकर शंकर तांबोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. गेल्या १८ वर्षांपासून UPSC व MPSC परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना समाजासमोर आदर्श म्हणून उभे करण्याचे कार्य संस्था सातत्याने करत असून, या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.

















