आरोग्य विभागाचे अधिकारी यांचे दुर्लक्ष कारणीभूत; १६ गावांमधील ग्रामस्थांची होतेय गैरसोय,
दावरवाडी, दि.१२(अभिजीत सोनवणे)
पैठण तालुक्यातील नांदर ता. पैठण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. गेल्या १० महिन्यांपासून निवासी डॉक्टरासंह अनेक पदे रिक्त असल्याने येथील आरोग्य व्यवस्था पुर्णपणे कोलमंडली असुन, रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी दावरवाडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या जयश्री राजेंद्र वाघमोडे यांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे.
नांदर येथील येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात सुमारे ४५ हजार लोकसंख्या आहे. या आरोग्य केंद्रात एकुण २१ पदे मंजूर आहेत, मात्र त्यापैकी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २ मंजूर पदांपैकी केवळ १ पद भरलेले असुन, पुरुष आरोग्य सेवकांच्या मंजुर ८ पदांपैकी ५ पदे रिक्त आहेत.
तर महीला आरोग्य सेवकांच्या मंजुर ९ पदांपैकी ५ पदे रिक्त आहेत. आरोग्य परिचरणी ४ पैकी २ पदे रिक्त आहेत. केवळ ९ कर्मचारी यांच्या बळावर १६ गावे आणि ६ उपकेंद्रांचा भार सांभाळत लागत असल्याने, उपस्थित कर्मचाऱ्यांची ओढाताण होत आहे.
ग्रामस्थांना खासगी दवाखान्यांचा आधार नांदरचे आरोग्य केंद्र पैठण- पाचोड राज्य महामार्गावर असल्याने येथे अपघातातील रुग्ण आणि परिसरातील दावरवाडी, नांदर, रहाटगाव, सोलनापुर, पाचोड बु. यांसारख्या मोठ्या गावातील नागरिक उपचारासाठी येतात. मात्र हजर डॉक्टर आणि पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने शासकीय आरोग्य केंद्र असूनही नाईलाजाने खाजगी दवाखान्यात जाऊन हजारो रुपये खर्च करावे लागतात.
वाघमोडे यांची सीईओंकडे निवेदनाव्दारे मागणी.
जि.प. सदस्या जयश्री वाघमोडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्ऩु पी. एम. आणि जिल्हा आरोग्य अधिकारी अभय धानोरकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या गंभीर परिस्थितीचे निवेदन दिले. ही रिक्त पदे तातडीने भरून ग्रामीण भागातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.




















