सकल मराठा समाज, आंबेडकरी समाज, मुस्लिम समाजासह विविध समाज घटकांचा मदतीचा हात…
कोपरगाव, दि.३१ : दिलीप गायकवाड
मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी कोपरगांव शहरातून समाजातील विविध घटकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

“आंदोलनकर्त्यांच्या पोटासाठी आमची जबाबदारी आहे” या भावनेतून आजपासून शिदोरी मदतकार्याला सुरुवात झाली
सकल मराठा समाज, आंबेडकरी समाज, मुस्लिम समाज आदी समाजघटकांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शिदोरी जमा करून ती मोठ्या उत्साहाने एका टेम्पोत भरून थेट मुंबईच्या आझाद मैदानावर रवाना केली.यात पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स, ताज्या चपात्या-भाकऱ्या, शाकाहारी भाज्या, चटण्या, लोणची अशा विविध पदार्थांचा समावेश आहे.
या कार्यात कोपरगांव सकल मराठा समाजाने पुढाकार घेतला असून, आंबेडकरी समाज व मुस्लिम समाजानेही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. “शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र आल्याने समाजातील ऐक्य दृढ होत आहे,” असे समाधान कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी उभे राहताना कोपरगांवातील समाजघटकांनी दाखवलेले हे एकात्मतेचे चित्र, आंदोलनाला बळ देणारे आणि जनतेच्या हृदयाला भिडणारे ठरले आहे.




















